जळगाव, दि.०३ – शासकीय सेवेत असताना दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांचे वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी अनेक वर्ष प्रतीक्षेत राहावे लागते. परंतु अलीकडे शासनाने अनुकंपा भरतीची मर्यादा वाढविल्याने शासन नियमाचे त्वरेने पालन करून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पोलीस दलातील दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांचे वारसांना जलद गतीने अनुकंपा उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवून १६ उमेदवारांना जळगाव जिल्हा पोलीस दलात ‘पोलीस शिपाई’ पदावर नियुक्ती आदेश देऊन पोलीस ‘स्थापना दिवस (रेझिंग डे)’ व नववर्षाची भेट दिली.
दरम्यान उपस्थित नवनियुक्त उमेदवार यांना पोलीस दलातील कर्तव्याबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. व भरती प्रक्रियेतील कामकाजासाठी मेहनत घेणारे पोलीस उपअधीक्षक (गृह) संदीप गावित, कार्यालय अधीक्षक प्रवीण पवार, वरिष्ठ लिपिक योगेश रावते, दीपक जाधव, सुनील निकम, लिपिक देविदास बाविस्कर, आस्थापना शाखा पोलीस अधीक्षक यांचे कौतुक केले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक संदीप गावित, कुणाल सोनावणे, कार्यालय अधीक्षक प्रवीण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे आदी उपस्थित होते.