अमळनेर, दि.११ – राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची खंडित झालेली परंपरा तब्बल आठ वर्षांनंतर आ. अनिल भाईदास पाटील यांच्या प्रेरणेने अमळनेरात पुन्हा सुरू होत असून, यानिमित्ताने खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “आमदार चषक” तथा राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि.१२ डिसेंबर पासून करण्यात आले आहे.
अमळनेर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर या ‘आमदार चषक’ क्रिकेट स्पर्धा होणार असून याची जय्यत आयोजकांकडून पुर्ण झाली आहे. यास्पर्धेत प्रथम बक्षीस १ लाख ११ हजार १११ रुपये तर द्वितीय बक्षीस ५५ हजार ५५५ रुपये असणार आहे. याव्यतिरिक्त मॅन ऑफ द सिरीज साठी ११ हजार १११ रु आणि उत्कृष्ठ बॉलर, उत्कृष्ठ बॅट्समन, उत्कृष्ठ फिल्डर व उत्कृष्ठ किपर यांना देखील आमदार चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रवेश फी ८ हजार रुपये असून सदर स्पर्धेत राज्यभरातील जवळपास ३२ संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या संघाच्या माध्यमातून काही महाराष्ट्र रणजी, गुजराथ रणजी व मध्यप्रदेश रणजी खेळलेले खेळाडू देखील दाखल होणार असल्याने त्यांचा खेळ क्रिकेट शौकिनाना पाहायला मिळणार आहे. प्रत्येकी २० ओव्हरचे सामने होणार आहेत.
१२ डिसेंबर ला होणार उद्घाटन..
आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दि.१२ डिसेंबर रोजी आ. अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान स्पर्धेची जय्यत तयारी अमळनेर क्रिकेट असोसिएशनने केली असून, संघाच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था प्रताप महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्यात येणार आहे. खान्देश शिक्षण मंडळाने मैदान व वसतिगृह उपलब्ध करून अनमोल सहकार्य केले आहे, तसेच मैदानाच्या व्यवस्थेसाठी अमळनेर नगरपरिषदेचे सहकार्य लाभत आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आमदारांनी यापूर्वीही दिले प्रोत्साहन..
खेळ आणि मैदान याचे विशेष आकर्षण आ. अनिल पाटील यांना आधीपासून असल्याने तरुणाईला देखील याची आवड असावी यासाठी अनेकदा ते खेळाच्या स्पर्धांना प्रोत्साहन देत असतात. आठ वर्षांपूर्वी आ. अनिल पाटील यांच्या प्रोत्साहन आणि प्रेरणेमुळेच अमळनेरात तब्बल तीन चार वर्षे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा रंगल्या होत्या, त्यानंतर काही अडचणीमुळे त्यात खंड पडला होता. गेली दोन वर्षे कोरोनामुळे इच्छा असूनही आमदार स्पर्धेस प्रोत्साहन देऊ शकले नव्हते. मात्र या वर्षी अमळनेर क्रिकेट असोसिएशनने इच्छा व्यक्त करताच आमदारांनी मोठ्या उत्साहाने प्रोत्साहन दिले असून त्यामुळे क्रिकेट असोसिएशन चे सदस्य उत्साहात तयारीला लागले आहेत.
आंतरशालेय स्पर्धाही रंगणार..
आमदार चषक च्या निमित्ताने स्थानिक विद्यार्थी मुलांच्या क्रिकेट खेळास वाव मिळावा त्यांनाही मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा आनंद मिळावा यासाठी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा देखील यादरम्यान घेण्यात येणार असून विजेत्यांना मिनी आमदार चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.