जळगाव, दि. २० – येथील मेहरूण भागात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेमध्ये भाविकांना भक्तीरसात चिंब होत आहेत.रविवारी भागवत कथेवेळी भगवान श्रीकृष्ण विवाह सोहळ्याच्या सजीव देखाव्याला भाविकांकडून उदंड प्रतिसाद लाभला. मेहरूण परिसरात या कीर्तन सप्ताहामध्ये धार्मिक उत्साह वाढला आहे.
बोदवड तालुक्यातील सुरवाडा येथील ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर हे दररोज दुपारी संगीतमय भागवत कथा सांगत आहे. यामध्ये रविवारी भगवान श्रीकृष्ण-रुख्मिणीचा विवाह सोहळा झाला. यात रुख्मिणीच्या भूमिकेत गार्गी नाईक व श्रीकृष्णाच्या भूमिकेत तृप्ती नाईक यांनी सजीव देखावा सादर केला.
टाळ चिपळ्यांच्या गजरात आणि वाद्यांच्या उत्साहात तसेच मंत्रोच्चारात रुक्मिणी श्रीकृष्ण विवाह झाला. श्रीकृष्ण व रुक्मिणी यांनी एकमेकांना हार घालून विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी भाविकांनी एकच जल्लोष केला. भगवान श्रीकृष्णाचा महिमा ज्ञानेश्वर महाराज यांनी कथेमध्ये सांगितला.
प्रसंगी महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील, नागपूर येथील वित्त व लेखा अधिकारी कपिल पवार, मेहरूणमधील नगरसेवक प्रशांत नाईक, श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी व मेहरूण भागातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.