मुंबई/जळगांव, दि.०७ – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या नवीन दालनातून कामाचा शुभारंभ केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील जनतेला शुध्द पाणी पुरवठा करण्याच्या संकल्पाची पूर्तता करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आधीच्या सरकारमध्ये याच खात्याची जबाबदारी आपण अतिशय समर्थपणे पार पाडली असून आता जुन्याच सहकार्यांच्या मदतीने नवीन आव्हान देखील समर्थपणे पेलणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या नवीन दालनाचे उदघाटन केले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ना. पाटील यांच्या हस्ते फित कापून दालनाचे उदघाटन झाल्यानंतर येथून त्यांनी कामकाजास प्रारंभ केला.
याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना ना. पाटील म्हणाले की, मला लागोपाठ दुसर्यांदा या खात्याची धुरा मिळाली आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या घरापर्यंत पिण्याचे शुध्द पाणी पोहचवण्याचा संकल्प हा जलजीवन मिशन माध्यमातून करण्यात आलेला आहे. या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आम्ही आजवर खूप मेहनत घेतली आहे. आता २०२४ पर्यंत जलजीवन मिशन पूर्ण करायचे असल्याने आम्ही नव्या दमाने कामाला लागलेलो आहोत. जुन्या सहकार्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी नमूद कले. नवीन निकषानुसार दरडोई ५५ लीटर निकषानुसार पाणी पुरवठा करण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचेही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी नमून केले.