जळगाव, दि.२५ – राजू बाविस्कर यांच्या लेखनात आक्रमताळेपणा नसून प्रांजळपणे लेखन केले आहे. त्यांनी नवा नायक दिला आहे. असे मत ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी राजू बाविस्कर लिखित काळ्या निळ्या रेषा या पुस्तक प्रकाशन समारंभात मांडले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की आज जातीयता व जाती व्यवस्था या वेगळ्या असुन यातील फरक समजुन घेतला पाहिजे. खानेसुमारीची सुरुवात करून इंग्रजांनी जातीयता या देशांमध्ये पसरवली. भारतीय परंपरा, रामायण महाभारत त्या संदर्भामध्ये नेमाडे यांनी आपले विचार मांडले आपल्या देशात एकोणावीस हजार पेक्षा जास्त जाती आहेत. पूर्वी ही जातीय व्यवस्था आडवी होती. इंग्रजांनी तिला उभी केली. पूर्वी दलित साहित्याचा जो ओघ सुरू झाला होता तो काही अंशी थांबला असून राजू बाविस्करांचे लेखन वेगळ्या प्रकारचे लेखन आले असून त्यांनी नवा नायक निर्माण केला आहे आणि हा नायक मराठी साहित्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांनी लेखक होणं हे आजच्या काळात अतिशय अवघड आहे. लेखकांना संरक्षणात वावरावे लागण हे भयंकर काळाचे प्रतीक आहे असं मत व्यक्त केलं. कलावंतांना पोलीस संरक्षणात वावरावे लागणे याचा अर्थ समाजाचे गणित बिघडलंय हे आपण समजून घेतलं पाहिजे. लेखकांना जशी रिस्क घ्यावी लागते तशी आता वाचकांनीही रिस्क घेतली पाहिजे. हे विचार श्रीकांत देशमुख यांनी मांडले कारण लेखक परिवर्तनाची शक्यता निर्माण करत असतो आणि आत्मचरित्र हे मुळाशी साचलेला अंधार दाखवण्याचं काम करतात या आत्मचरित्राच्या परंपरेत राजू बाविस्कर यांचे पुस्तक हे स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणार आहे असं मत देशमुख यांनी मांडले.
सदानंद देशमुख यांनी राजू बाविस्कर यांच्या आत्मचरित्रातील विविध प्रकरणांचा आढावा घेत त्यातील चित्र आणि भाषा याविषयी मांडणी केली कवी अशोक कोतवाल यांनी ग्रामीण जगणं आणि बाविस्कर यांना दिसलेली चित्रभाषा त्यांच्या लेखनासोबतच आपल्याला चित्रातून भेटते चित्रकार असलेले बाविस्कर हे अनुभवातून लेखक झालेले आहेत त्यामुळे त्यांनी रेखाटलेलं आत्मचरित्र हे महत्त्वाचे ठरते असे मत कवी अशोक कोतवाल यांनी मांडले ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी बाविस्करांच्या चित्रकलेच्या प्रवासाचा इतिहास मांडताना त्यांच्यातील वेगळेपण विशद केले परिवर्तन सोबतचा त्यांचा असलेला स्नेह आणि परिवर्तनची भूमिका मांडताना चित्रांच्या संदर्भामधलं त्यांचं काम व अक्षरापर्यंतचा झालेला त्यांचा प्रवास रंगकर्मी पाटील यांनी विशद केला.
याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन होते. त्यांनी आपल्या भाषणात कला आणि साहित्य यांचा विचार मांडताना बाविस्करांच्या चित्रातील चेहरे आणि हरवलेले डोळे यावर भाष्य केलं. एक उद्योजक म्हणून जळगाव जिल्ह्याच्या कलेच्या प्रांतामध्ये जे जे चांगलं करता येईल ते आम्ही करत आहोत. बाविस्करांच्या या प्रवासात थोडा खारीचा वाटा उचलता आला चित्रकार राजू बाविस्कर यांची अनेक चित्रे जैन उद्योग समूहाच्या गांधी रिसर्च फाउंडेशन आणि इतर आस्थापनांमध्ये आहेत. बाविस्करांच्या कलेच्या प्रवासाविषयी अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मंचावर कवी रमेश पवार आणि भारती बाविस्कर उपस्थित होत्या. पुस्तक प्रकाशनानंतर भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते राजू बाविस्कर यांच्या पत्नी भारती बाविस्कर यांचा सन्मान करण्यात आला. सत्यजित साळवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वल्लभदास वालजी वाचनालयाच्या नूतन सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त त्यांची गाणी सुदीप्ता सरकार, मंजुषा भिडे, हर्षदा कोल्हटकर यांनी सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले, यशस्वीतेसाठी मंगेश कुलकर्णी, अभिजीत पाटील, ओंकार पाटील, प्रसेन बाविस्कर, सुनीला भोलाने यांचे सहकार्य लाभले.