जळगाव, दि.२२ – चेन्नई (महाबलीपुरम्) येथे २८ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (एआयसीएफ) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून व तमिळनाडू शासनाने पुरस्कृत केल्यामुळे या स्पर्धा पहिल्यांदाच भारतात होत आहेत.
या जगातील सर्वात मोठ्या व महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जळगावातील जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे फिडे पंच प्रवीण ठाकरे यांना सामना पंच म्हणून नियुक्त केल्याचे जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई व वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे. असा बहुमान मिळवणारे जळगाव जिल्ह्यातील ते पहिलेच बुद्धिबळ पंच आहेत.
दर दोन वर्षांनी होणाऱ्या या बुद्धिबळ ऑलंपियाड स्पर्धेचे यावेळचेे वैशिष्ट्य म्हणजे विक्रमी देशांचा सहभाग, यावेळी तब्बल १८७ देश या स्पर्धेत सहभागी होत असून १८८ संघ खुल्या गटात तर १६२ महिला संघ या सांघिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत अधिकृतरित्या खेळणार आहेत. खुल्या व महिला गटात स्वतंत्रपणे स्पर्धा खेळविली जाणार असून स्विस् लिग पद्धतीने एकूण ११ फेऱ्यांअंती अंतिम विजेते संघ घोषित केले जातील. भारताकडून आपले सर्वोत्तम संघ यात सहभागी असून खुल्या व महिला या दोन्हीही गटांमध्ये भारतीय चमुंचा ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ असे अनुभुवी व तरुण वर्गांचा समावेश असलेले संघ उतरतील.
जगजेत्ता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसनसह जगातील सर्वोत्तम १७५० बुद्धिबळपटू त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक व २०५ नियुक्त केलेले पंच मिळून जवळपास २२०० प्रतिनिधी या सर्वांची चोख व्यवस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या स्पर्धा व्यवस्थापन समितीने व तामिळनाडू शासनाने केली आहे. एकूण नियुक्त केलेल्या २०५ आंतरराष्ट्रीय पंचापैकी ९० आंतरराष्ट्रीय पंच भारतातील आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील अकरा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंचांची निवड झाली आहे. प्रवीण ठाकरे हे गेली २० वर्षांपासून बुद्धिबळ संघटक, संयोजक, प्रशिक्षक व पंच म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमी, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मानाचा ‘गुणवंत क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या पंच कमिटी चे सचिव म्हणून कार्यरत आहेत तर याचबरोबर विविध भूमिकेतून बुद्धिबळ क्षेत्राच्या वाढीसाठी ते सातत्याने कार्यरत असतात. या निवडीसाठी प्रवीण ठाकरे यांचे आखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
या त्यांच्या यशासाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख, पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील, जैन स्पोर्ट्स चे समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, नरेंद्र पाटील, संजय पाटील, यशवंत देसले, तेजस तायडे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे, नरेंद्र फिरोदिया, विनय बेळे, पी. बी. भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.