खान्देश प्रभात विशेष | भुसावळला बिगेस्ट जंकशन ऑफ इंडिया ऐवजी वडा पाव कॅपिटल ऑफ द वर्ल्ड घोषित करावे अशी माझी सरकार कडे मागणी आहे. आणि भुसावळकरांना दुसऱ्या कश्या पेक्षा वडा पाव जास्त भारी बनवता येतो यावर माझा ठाम विश्वास आहे. महाराष्ट्रातल्या अनेक शहरात वडा पाव बनतो. पण त्यानी वडा पाव कसा बनवावा, हे भुसावळला येउन शिकून घ्यायला हवे. पुण्यात मला एकदा वडापाव मध्ये मनुका लागला होता. जर कडेलोटाची शिक्षा असती, तर मी त्या हॉटेल मालकाला लोटून दिला असता .
आलू आणि बेसनाचा चिखल कालवण्याला काही शहरात वडा पाव म्हणतात. त्यांची मला दया येते. डायट वडा पाव नावाचा एक बोगस पदार्थ मी एकदा खाल्ला होता. हे मी मान खाली घालून कबूल करतो, परत हा गुन्हा मी करणार नाही. क्यालरी मोजून घाबरत घाबरत खायचा हा पदार्थच मुळीच नाही. वडापाव सोबत तळलेल्या मिरच्या खाणे हे अत्यंत शौर्याचे लक्षण आहे. ही असली मिरची आपण खाल्ली तर काय परिणाम होईल असले भेकड विचार ज्यांच्या मनात येतात त्यांनी दह्यात बुडवून ढोकळा खावा, वडापाव नाही.
वड्या सोबत छोटा सा पाव देतो तो मुरलेला भुसावळकर वडापाव वाला नाही, खरा भुसावळ कर वड्या सोबत एवढे जाड पाव देतो, कि पाव फाडून त्या मध्ये वडा टाकण्या ची हिम्मत कोणीच करू शकत नाही. थंड वडापाव देण्याचं किंव्हा मायक्रोवेव्ह मधून वडा गरम करून देण्याचं पाप भुसावलकर स्वप्नातही करणार नाही. ज्याला वडा पाव आवडत नाही त्याचा कडे भुसावळ चे रेशन कार्ड नाही हे गृहीत धरावे
वडापाव ही भुसावळची रेल्वे पेक्षा जास्त उदात्त ओळख असायला खरतर काहीच हरकत नाही, पण वडापाव साठी केंद्राचा निधी येत नाही आणि रेल्वे साठी येतो. म्हणून ठेकेदार आजही भुसावळला “वडापाव जंकशन” ऐवजी भुसावळ जंक्शन म्हणतात. शालेय पोषण आहारात बेचव खिचडी ऐवजी वडापाव दिला, तर पोर जास्त आनंदाने शाळेत जातील आणि खातील. फक्त वडा पाव भुसावळचा हवा. लॉकडाउन मध्ये जर बाहेर निघालात तर आयुष्यभर वडापाव खाता येणार नाही अशी जर शिक्षा ठेवली असती तर भुसावलकर घराच्या काय दाराच्या बाहेर पडला नसता, यावर माझा ठाम विश्वास आहे.
महाराष्ट्र भर कितिही बोंबलत फिरा कि जम्बो वडा, गोली वडा, जोशी वडेवाला ह्यांनी चुकूनही भुसावळ मध्ये शाखा टाकायच्या भानगडीत पडू नये, भुसावळकर एका महिन्यातचं त्याचं दुकान बंद करतील. आम्हाला कडक इस्त्रीचे कपडे घातलेला वडा पाव वाला आवडत नाही. ओन्ली बन्यान. फार फार तर घासीलाल शेठला आम्ही कधीतरी शर्ट घालण्याचे स्वतंत्र दिले आहे. घासीलाल शेठ पासून सुरु झालेली परंपरा बंडू ते शांताराम पासून ते पाहुणा ते राजू आणि आता आसोदे वाला वडापाव व्यवसाय लीलया सांभाळत आहे..
टिप- भुसावळात आल्यावर पावा मध्ये चटणी किंवा टोमॅटो सॉस मागू नये.. आजूबाजूचे तुम्ही परग्रहावरून आलेत कि काय असे पाहतील.. घाम पुसण्या साठी रुमाल सोबत आणावा..
Source : अभिराम मेहेंदळे, भुसावळ यांच्या फेसबुक वाॅल वरून