रावेर, दि. २१ – तालुक्यातील मोठे वाघोदा येथील पत्रकार तथा कवी व सामाजिक कार्यकर्ते कमलाकर माळी यांना रविवार नाशिक येथे योग दिनाच्या निमित्ताने कालिदास कलामंदीर सभागृहात समाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर समाज गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. त्यांनी आतापर्यंत गावात मोफत नेत्र शिबीर, रक्तदान शिबिर, गाव फलक, ग्रामस्थांसाठी मोफत वाचनालयची स्वखर्चाने सोय केली आहे.
कोवीड मध्ये मोफत मास्क वाटप तसेच व्हाॅट्सअप ग्रुप च्या माध्यमातुन विविध उपक्रम माळी राबवत असतात. अशा विविध सामाजिक कार्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी नाशिक येथील पत्रकार संघातर्फे पुरस्कारासाठी निवड झाली. यावेळी कामगार नेते संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा कोठावदे, पर्यटन उद्योजक शबनम खान, योग पंडित डॉ. पूनम बिरारी, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, प्रज्ञा कांबळे, वासुदेव काळे आदी उपस्थित होते.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी-प्रास्ताविक करताना संस्थेची माहिती दिली. दरम्यान पुरस्कार मिळाल्याबद्दल कमलाकर माळी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.