जळगाव, प्रतिनिधी : उधारीवर पान आणि सिगारेट दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरून भंगार व्यावसायिकावर कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना जळगाव शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ घडली. या घटनेनंतर फरार झालेल्या तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली असून, एका विधिसंघर्षित बालकाचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. किशोर माधवराव बाविस्कर (वय ४१, रा. शिवनगर, खेडी बुद्रुक, ता. जळगाव) यांचा भंगार व्यवसाय असून, पानटपरीचाही व्यवसाय आहे. आरोपींनी उधारीवर पान-सिगारेट मागितले होते. मात्र, त्यांनी उधारीवर देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपींनी बाविस्कर यांना शिवीगाळ केली. तसेच, ‘तुम्हा दोन्ही भावांना जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली.

त्यानंतर आरोपींनी बाविस्कर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी आनंद हरी पाटील याने त्याच्याकडील धारदार कोयत्याने, तर हर्षल रविंद्र शिंदे याने हातातील तलवारीने बाविस्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी बाविस्कर यांना उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३५१(२), ३५२, ३(५) तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ नुसार २३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आरोपींबाबत माहिती संकलित केली. गोपनीय माहितीच्या आधारे आनंद हरी पाटील (वय २४), हर्षल रविंद्र शिंदे (वय २०) आणि गौरव विनोद पाटील (वय २०), तिघेही रा. खेडी, ता. जळगाव, यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या तपासासाठी अटक करण्यात आली. या प्रकरणात एका विधिसंघर्षित बालकाचाही सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव मोरे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत मराठे, पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.









