जळगाव, दि.०२ – शहरातील मुस्लिम इदगाह कब्रस्तान ट्रस्ट तर्फे मंगळवारी होणाऱ्या रमजान ईदच्या नमाजसाठी अजिंठा रोड वरील इदगाह मैदानावर तयारी पुर्ण करण्यात आली असून त्यात ईदगाहचे विस्तारीकरण सुद्धा करण्यात आले असल्याने त्या मैदानावर अडीच हजार नमाजी नमाज अदा करू शकतील.
याठिकाणी असलेला आठ हजार स्क्वेअर फूट चा हॉल, मशीद, शॉपिंग कॉम्प्लेक्स वरील टेरेस ची सुद्धा साफसफाई करून ठेवण्यात आली असून सुमारे २५ हजार लोक एकाच वेळी नमाज अदा करू शकतील अशी माहिती मुस्लिम इदगाह कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी दिली आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष वहाब मलिक, उपाध्यक्ष मुश्ताक अली सय्यद, रियाज़ मिर्ज़ा, खजिनदार अश्फाक बागवान, सहसचिव अनिस शहा, मुकीम शेख संचालक नजीर मुलतानी, मजहर खान, ताहेर शेख आदी उपस्थिती होते.
पोलिसांनी बंदोबस्तासाठी केली पाहणी..
जळगाव विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता व एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिकारे यांनी प्रत्यक्ष मैदानावर येऊन पाहणी केली. व आवश्यक ती माहिती ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांच्या कडून घेतली. आवश्यक तो पोलीस बंदोबस्त लावण्याची हमी दिली.
ईदच्या नमाजचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम..
प्रत्यक्षपणे ईदची नमाज ८.३० वाजता असली तरी आठ वाजता ईदगाह ट्रस्टचे सचिव फारूक शेख हे ट्रस्ट चा अहवाल सादर करणार आहे. अध्यक्ष वहाब मलिक हे शुभेच्छापर दोन शब्द बोलतील यानंतर मुफ़्ती हारून नदवी उर्दू भाषेत प्रवचन करतील. तसेच जळगाव शहर मुस्लिम समाजामार्फत सहा प्रकारचे ठराव सादर करून ते उपस्थितांच्या साक्षीने मंजूर करण्यात येतील. नंतर नमाज ची कार्यपद्धती समजाविण्यात येईल व त्यानंतर प्रत्यक्षात नमाज अदा करण्यात येईल. अरबी खुतबा व दुआ होऊन नमाज संपुष्टात येईल.