भुसावळ, दि. ०२ – विभागीय रेल्वे सल्लागार समिती अर्थात झेडआरयुसीसीच्या समितीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांची नियुक्ती नवी दिल्ली येथून रेल्वे बोर्डाचे मॅनेजर संजय मनोचा यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिफारसीने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे बोर्डाने ही नियुक्ती केली असून तशा प्रकारचे पत्र मध्य रेल्वे मुंबईचे जनरल मॅनेजर यांना पाठवले आहे. जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे. साकेगाव सारख्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदापर्यंतची वाटचाल आपल्या संघटन शैलीमुळे रविंद्र नाना पाटील यांनी करून दाखवली आहे.
सध्या जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, शिक्षण समिती सदस्य, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष यासह विविध पदांवर सध्या ते कार्यरत आहेत. पक्षबांधणीसाठी सातत्याने सक्रिय असणारे रविंद्र नाना पाटील यांच्या कार्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आल्याने त्यांची रेल्वे बोर्डाच्या विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीवर (झेडआरयुसीसी) नियुक्ती झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.