जळगाव, दि.१९ – भरारी फाऊंडेशनतर्फे जळगावात बहीणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी सागरपार्क मैदानावर थाटात संपन्न झाले. दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय तथा सेवाभावी कार्य करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, डाॅ.अपर्णा भट-कासार, भालचंद्र पाटील, डाॅ.पी.आर.चौधरी, स्वरूप लुंकड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचीत्य साधुन दि.१८ ते २४ एप्रिल दरम्यान सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले असून महिला बचत गटांचा महत्वपुर्ण सहभाग यात आहे. महिला बचत गटांच्या वस्तुंना हक्काच व्यासपीठ मिळावं यासाठी महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानी सह, खान्देशातील विविध खादय पदार्थांचा या महोत्सवाच्या निमित्तान जळगांवकरांना आस्वाद घेता येणार आहे. तसेच नागरिकांनी या महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.