जळगाव, दि. ३० – युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी युवासेना निश्चय दौर्यावेळी वेळात वेळ काढून शहरातील आकाशवाणी चौकाजवळ कार्यान्वित ‘महापौर सेवा कक्षा’ला सदिच्छा भेट दिली. तसेच तेथील कार्यरत सहकार्यांकडून संपूर्ण कार्यप्रणाली समजावून घेत वर्षभरात जवळपास दहा हजारांवर जळगावकरांच्या समस्या/तक्रारींचे निवारण झाल्याची माहिती जाणून घेतली.
‘कोविड-१९’च्या अनुषंगाने ज्या नागरिकांचे पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले असतील, त्यांनी दुसरा डोस त्वरित घ्यावा, असे आवाहन ‘महापौर सेवा कक्ष’तर्फे करण्यात आले होते. त्याला जळगावकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला आदी सर्व माहिती ‘महापौर सेवा कक्ष’च्या प्रतिनिधींकडून सरदेसाई यांनी जाणून घेतली.
महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या या अभिनव उपक्रमाचे वरुण सरदेसाई यांनी तोंडभरून कौतुक केले. तसेच हा उपक्रम यशस्वितेसाठी करीत असलेल्या सहकार्याबद्दल महापालिका आयुक्त, उपायुक्त, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचार्यांचे अभिनंदन करून त्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे यापुढेही हा उपक्रम असाच अविरत सुरू ठेवला जावा, असेही सुचविले.
याप्रसंगी महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख आविष्कार भुसे, महाराष्ट्र सहसचिव विराज कावडिया, शिवराज पाटील, चंद्रकांत शर्मा, पंकज राणे, स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, अमित जगताप, पियूष हासवाल, संकेत कापसे आदींसह युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.