जळगाव, दि.२८ – अमृता इंडट्रीज व भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र कोल्हापूर यांच्या वतीने परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन कोल्हापुर येथे करण्यात आले आहे. जळगावात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेली संजिवनी फाऊंडेशन संचलित ‘परिवर्तन जळगाव’ संस्था ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात सर्जनशील निर्मिती करणारी संस्था म्हणून ओळखली जाते.
जळगावसह खान्देशाची ओळख असलेली भाषा, कविता, संगीत यांचा समावेश असलेल्या कार्यक्रमांनी परिवर्तन महाराष्ट्रातील विविध शहरात कला महोत्सव घेत असते. कोल्हापूरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र व अमृता इंडस्टीज यांच्यावतीन तीन दिवसीय ‘परिवर्तन कला महोत्सवा’चे आयोजन दि. १, २ व ३ एप्रिल २०२२ दरम्यान करण्यात आले आहे. शाहू स्मारक सभागृहात होत असलेल्या या महोत्सवाची सुरवात १ एप्रिल शुक्रवारी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्या जिवनावर आधारित शंभु पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित ‘अमृता साहिर इमरोज’ या नाटकाने होणार आहे.
दि.२ एप्रिल शनिवारी प्रसिद्ध बंगाली लेखक बिभुतीभुषण बंदोपाध्याय यांच्या ‘पथेर पांचाली’ या कादंबरीचे सादरीकरण व साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानीत कवी श्रीकांत देशमुख लिखित व शंभु पाटील नाट्यरुपांतरीत योगेश पाटील दिग्दर्शित ‘नली’ एकलनाट्य सादर होणार आहे. तर दि. ३ एप्रिल रविवारी बहिणाबाई चौधरी यांच्या कविता व गाण्यांच्या ‘अरे संसार संसार’ या सांगितीक कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची तर दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे. सर्व कार्यक्रमांची वेळ सायं. ६.३० वाजेची आहे. याअगोदर पुणे, कणकवली, धुळे अशा विविध ठिकाणी परिवर्तनचे महोत्सव यशस्वीपणे संपन्न झालेले आहेत. तीन दिवस, एकाच संस्थेची निर्मिती असलेले तीन उत्तम कार्यक्रम असलेला खानदेशचा हा महोत्सव कोल्हापूरात पहिल्यांदा होत आहे.
परिवर्तनची नाटके व सांगीतिक कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सादर होत असतात. ही जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी ऊर्जा देणारी गोष्ट आहे. सर्जनशील निर्मिती हे परिवर्तचे वैशिष्टे असून अरे संसार संसारचे आतापर्यंत २७ प्रयोग, नलीचे ५२ व ‘अमृता साहीर इमरोज’ चे ६ इतके यशस्वी प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रभर गाजत असलेला हा महोत्सव कोल्हापूरातील रसिकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे.