जळगाव, दि. ०९ – भारतीय सिंधु सभा जळगाव व महाराष्ट्र सिंधी साहित्यिक अकादमी मुंबई यांच्यावतीने सिंधी नृत्य नाटीका ‘सुहिणा सिंधी जग जो शान’ चे आयोजन रविवारी जळगावातील संभाजी राजे नाट्यगृह करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात भारतीय सिंधु सभेच्या धर्मगीताने करण्यात आली. शकुंतला तेजवानी यांनी गीत सादर केले. अतिशय प्रभावी व प्रेरणादायी या नाटकात २१ कलावंतानी भाग घेतला.
संगीत नृत्य नाटीकेचे दिग्दर्शन उल्हासनगर येथील जूली तेजवानी यांनी केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा. आ. गुरूमुख जगवाणी, भारतीय सिंधी समाज जळगावचे अध्यक्ष डॉ. एम. पी. उदासी, सचिव प्रेम कटारिया, खजिनदार किशोर बेहराणी, दयानंदजी, रितू रायसिंघानी, दिनेश डोडोनी, ऍड. संतोष उदासी, डॉ राहुल उदासी, मनोहरलाल जधवानी, दादा प्रतिमदास रावलानी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधी समाज जळगावचे अध्यक्ष डॉ.मुलचंद उदासी यांनी केले. त्यांनी उपक्रमाचा गौरव करतांना नाटकातून समाजप्रबोधन होण्यासाठी आयोजन केल्याचे मांडले. सिंधी समाज जळगावचे महामंत्री प्रेम कटारिया यांनी संस्थेतर्फे वर्षभरात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच नाटकातून समाजाच्या उन्नतीसाठी व युवा पिढीसाठी गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. गुरमुख जगवानी यांनी उपस्थित समाज बांधवांना सम्बोधित करतांना सिंधी समाज जळगाव शाखेच्या कार्याचा गौरव केला व कार्यक्रमासाठी परिश्रम घेणा-या सर्वांचे अभिनंदन केले.
नाटकातून आपली भाषा व संस्कृती यावर भाष्य करणारी ही नृत्यनाटका निसर्गाशी नातं जोडायला सांगते. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण न करता समाजोध्दारासाठी कटीबद्ध असावे असा संदेश देणारे हे नाटक सर्वांना प्रभावित करणारे होते.
कार्यक्रमाच्या शेवटी नृत्यदिग्दर्शक तुशार केसवानी यांनी मुले व पालकांना सोबत घेत सिंधी मशअप सिंधी बोली व लालसाई झूलेलाल नृत्याचे सादरीकरण केले. नाटकाला शहरातील व्यापारी, उद्योजक, प्रतिष्ठित नागरीक, सिंधी समाज बांधव व आदर्श सिंधी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेश्मा बहेरानी व डॉ. राहुल उदासी यांनी केले. आभार प्रदर्शन किशोर तलरेज़ा यांनी केले.