जळगाव दि. ०५ – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या जाहिरात कला विभागाचे प्रमुख व अमूर्तचित्रकार विकास मल्हारा यांना जगप्रसिद्ध बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई आयोजीत 130 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात “अनटायटल्ड” या चित्राला सर्वोच्च सन्मान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सुवर्णपदक, ५०,०००/- (पन्नास हजार) व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खानदेशातील कलावंताला हा प्रतिष्ठेचा सन्मान पहिल्यादाच मिळाला आहे.
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ‘विकास मलारांची अमूर्त चित्रे त्यांच्या अंतर्बाह्य दिलखुलास स्वभावासारखी आहेत. निसर्गांवर त्यांचे भरभरुन प्रेम आहे, त्यातीलच “अनटायटल्ड”या चित्राला बाॅंबे आर्ट सोसायटी मुंबई चा प्रतिष्ठेचा सर्वोच्च सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. जैन इरिगेशनला हा अभिमानाचा क्षण आहे.’ अशी प्रतिक्रीया कौतूक करताना दिली.
अनटायटल्ड हे अमूर्त चित्र असून कागदावर ॲक्रॅलिक व चारकोल अशा मिश्र माध्यमात ते साकारलेले आहे. या चित्रातील आकार वास्तव नसले तरी त्यातील रंगछटा, रंगलेपन, पोत आणि आवेगी उस्फूर्तता सभोवतालच्या निसर्गाची रसिकाला जाणीव करून देते. या चित्रातील आगळी पण वेधक मांडणी, प्रकाशाचे कवडसे, झुंजुमुंजु अवकाश, रंगलेपनातील अस्वस्थ अधिरता, करड्या निळ्या, करड्या तपकिरी रंगाचा बेमालूम वावर आणि विशेषतः या सार्यांना बांधून ठेवणाऱ्या रेषांची असंबंद्ध गुंडाळी सारेच बोलके आहे. स्पष्ट अस्पष्ट आकार अवकाशातून ठायीठायी अलगद अशी सळसळ ऐकू यावी इतपत ध्वनीचा नादमयी अलवार झंकार रसिक मनाचा वेध घेताना आपण अनुभवतो. हेच कदाचित परीक्षकांनाही भावले असावे. १३४वर्षे (स्थापना वर्ष-१८८८) जुन्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी परंपरा असलेली जगद्विख्यात बॉम्बे आर्ट सोसायटी ही स्वायत्त कलासंस्था कला आणि कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय प्रदर्शने,कला शिबिरे,कला उपक्रम राबवित असते. अशा प्रतिष्ठित संस्थेचा सर्वोच्च बहुमान विकास मल्हाराच्या रूपाने खानदेशाला मिळाला आहे ही आनंददायी बाब आहे.
विकास यांनी मुंबईच्या प्रसिद्ध एल.एस.रहेजा स्कूल ऑफ आर्ट या कला संस्थेतून जी.डी.आर्ट(उपयोजित) ही पदविका घेतलेली असून त्यांनी काही काळ मुंबईत विविध जाहिरात एजन्सीचा अनुभव घेऊन ते गेल्या 33 वर्षांपासून जैन इरिगेशन,जळगांव मध्ये काम करतात. पद्मश्री भवरलाल जैन, पिताश्री स्व.सुंदरलाल मलारा यांचा परम आशीर्वाद, प्रसिद्ध अमूर्त चित्रकार प्रभाकर कोलते यांच्याशी असलेला चित्रसंवाद आणि अशोक जैन यांचे समर्थ पाठबळ, चित्रकार प्रकाश वाघमारे, रंगकर्मी शंभू पाटील, चित्रकार राज शिंगे, प्राचार्य राजेंद्र महाजन, व चित्रकार राजू बाविस्कर, विजय जैन इ. मैत्र गोतावळ्याचा सहवास त्याच्या कला आयुष्याला समृद्ध करीत आहे अशी विकास यांची प्रामाणिक सोच आहे.
बॉम्बे आर्ट सोसायटी ही जगभर नावाजलेली स्वायत्त कलासंस्था आहे. या संस्थेचा विकास मल्हारा यांना मिळालेला सर्वोच्च सुवर्ण पुरस्कार हा खानदेशातील स्व. चित्रकार वसंत वानखेडे, गुलजार गवळी, शामेंदु सोनवणे या समृद्ध कला वारशाचा हा सन्मान आहे असे मला वाटते. रावबहादुर धुरंधर, एस,एल. हळदणकर, गोपाल देऊस्कर, जी.एम.सोलेगावकर, अमृता शेरगील, एन.एस.बेंद्रे, के.के.हेब्बर, रझा-आरा-गाढे, अलमेलकर, बाबुराव सडवेलकर, प्रभाकर कोलते, वासुदेव कामत इ. भारतीय चित्रकलेतील दिग्गजांच्या सुवर्ण यादीत विकास मल्हारा यांचे नाव झळकले ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.”अशी प्रतिक्रीया चोपडा ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी दिली.