प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन

जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताचे स्थान बळकट करण्याची संधी; जळगावात उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत माहितीपर मेळावा

जळगाव, प्रतिनिधी : भारतीय प्लास्टिक उद्योगाला जागतिक तंत्रज्ञान, बाजारपेठा आणि व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७’ हे प्रदर्शन जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे प्लास्टिक व्यापार प्रदर्शन ठरणार आहे. येत्या २१ ते २५ जानेवारी २०२७ दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
द ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AIPMA) या प्लास्टिक उद्योगातील प्रमुख शिखर संस्थेतर्फे ३० ऑक्टोबर रोजी जळगावातील हॉटेल प्रेसिडेंट येथे उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत माहितीपर मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोहन घुगे (आयएएस) आणि स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक चौधरी यांची सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती होती. जळगाव इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र लड्ढा, जळगाव प्लास्टिक रिप्रोसेसर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद बियाणी तसेच महेंद्र रायसोनी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले.
प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ मध्ये कच्चा माल, यंत्रसामग्री, साचे, प्रक्रिया तंत्रज्ञान, तयार उत्पादने आणि विविध सेवांचा समावेश असणार आहे. प्लास्टिक उद्योगाच्या संपूर्ण मूल्यसाखळीला एकाच व्यासपीठावर आणण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. उद्योगातील उत्पादक, पुरवठादार, खरेदीदार, तंत्रज्ञान कंपन्या आणि उद्योजकांना परस्परांशी व्यावसायिक संपर्क वाढविण्याची संधी मिळणार आहे.
भारतीय प्लास्टिक उद्योगात सुमारे ९४ हजार प्रक्रिया उद्योग कार्यरत असून, या क्षेत्राचे उत्पादनमूल्य सुमारे १९ लाख कोटी रुपये म्हणजेच ९७ अब्ज अमेरिकी डॉलर असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या उद्योगातून सुमारे ५० लाख रोजगार निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सरासरी दरडोई प्लास्टिक वापर ५० किलो असताना भारतात तो सुमारे १६ किलो आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत या उद्योगाच्या विस्ताराला मोठी संधी असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
प्रदर्शनासोबत २१ समांतर कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये शाश्वतता व प्लास्टिक पुनर्प्रक्रिया, स्वयंचलन, इंडस्ट्री ४.०, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायवृद्धी या विषयांवर भर दिला जाणार आहे. या उपक्रमांमुळे उद्योजकांना नवीन तंत्रज्ञान समजून घेणे, ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि देश-विदेशातील व्यावसायिकांशी संपर्क वाढविणे शक्य होणार आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या प्लास्टिव्हिजन इंडियाच्या १२व्या आवृत्तीला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला होता. त्या प्रदर्शनात २० देशांतील १,२३८ प्रदर्शक सहभागी झाले होते. भारतातील ६०० शहरांसह ८४ देशांतील व्यावसायिक अभ्यागतांच्या एकूण २ लाख ३४ हजार भेटी नोंदविण्यात आल्या होत्या. तसेच २६ देशांतील १०२ पात्र आंतरराष्ट्रीय निमंत्रित खरेदीदारांनी सहभाग घेतला होता.
प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ चे मानद अध्यक्ष जयेश खिमजी रांभिया यांनी या प्रदर्शनाला भारतीय प्लास्टिक उद्योगाच्या विकासातील महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे म्हटले आहे. जागतिक तंत्रज्ञान, बाजारपेठा आणि व्यवसायाच्या संधी भारतीय उद्योजकांपर्यंत पोहोचविणे, तसेच जागतिक स्तरावर नवकल्पना, स्पर्धात्मकता आणि उद्योगवाढीला चालना देणे हे या प्रदर्शनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रदर्शनाचा भारतासह परदेशातही व्यापक प्रचार करण्यात येत असून, १०० हून अधिक प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनांमध्ये सहभाग घेऊन जागतिक तंत्रज्ञान पुरवठादार, खरेदीदार आणि उद्योजकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ हे प्रदर्शन २१ ते २५ जानेवारी २०२७ दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे होणार असून, भारतीय प्लास्टिक उद्योगाच्या आधुनिकीकरणाला आणि जागतिक विस्ताराला चालना देण्याच्या दृष्टीने या प्रदर्शनाकडे पाहिले जात आहे.








