जळगाव, प्रतिनिधी : नागरिकांकडून कर वसूल करताना त्यांना दर्जेदार नागरी सुविधाही उपलब्ध करून द्या. केवळ महसूल वसुलीचे उद्दिष्ट न ठेवता नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्या, अशा स्पष्ट सूचना आमदार सुरेश भोळे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. स्वच्छता, कचरा संकलन आणि विविध प्रलंबित नागरी प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी महापालिकेत दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुमारे साडेतीन तास मॅरेथॉन बैठक झाली.

या बैठकीला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जिवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, पंकज गोसावी, संजय राऊत, मुख्य लेखाधिकारी विजयकुमार सोनवणे, लेखाधिकारी राजू लाकुडतोडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि बीव्हीजी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरातील अस्वच्छता आणि कचरा संकलनाच्या समस्येवर बैठकीत विशेष चर्चा झाली. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराने गांभीर्याने पार पाडणे आवश्यक आहे. बीव्हीजी कंपनीला यापूर्वीही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही कामकाजात अपेक्षित सुधारणा दिसून आली नाही, तर संबंधित कंपनीवर कारवाई करावी, असे निर्देश आमदार भोळे यांनी दिले. नागरिकांना नियमित आणि दर्जेदार स्वच्छता सेवा मिळालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शहरातील रस्त्यांवर असलेले विद्युत रोहित्र (डीपी) आणि विद्युत खांब यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. विविध विभागांतील समन्वयाअभावी विकासकामे प्रलंबित राहू नयेत आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश आमदार भोळे यांनी दिले.









