जळगाव ,प्रतिनिधी : जळगाव-भुसावळ महामार्गावरील नशिराबादजवळ असलेल्या मकरा फटाक्यांच्या कारखान्यासमोर गुरुवारी (दि. २९) रात्री दहाच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. राखेचा डंपर आणि सोयाबीनची वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर झालेली धडक इतनी जोरदार होती की, यामध्ये ट्रकचालक जागीच गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत पावले, तर डंपरचालकही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातकडून नागपूरच्या दिशेने सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक (क्र. MH 40 BG 6287) चालक रमेश चंद्र यादव (वय ५६, रा. उत्तर प्रदेश) चालवत होते. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास नशिराबादजवळील मकरा फटाक्यांसमोर आले असता, दीपनगरकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या राखेच्या डंपरची (क्र. MH 15 GW 3879) या ट्रकला जोरदार समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आणि ट्रकचालक रमेश चंद्र यादव हे चुरडलेल्या केबिनमध्येच अडकून पडले.

अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक सतीश बेलसरे, त्यांचे सहकारी आणि परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी कसरत केली. अखेर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला सारून, सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर चालक रमेश चंद्र यादव यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या भीषण अपघातात डंपरचालक मुक्तचर अली (रा. मध्य प्रदेश) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सुमारे तीन तास वाहतूक ठप्प राहिल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप व गैरसोयीचा सामना करावा लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.








