फराज अहमद | जामनेर, दि.३१ – येथील कांग नदीच्या पुलाखाली बोदवड येथील शुभम नंदू माळी या २५ वर्षिय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकचं खळबळ उडाली.
बोदवड येथील शुभम नंदू माळी हा युवक पहूर येथे खाजगी ट्रकवर चालक म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान सोमवारी त्याचा मृतदेह जामनेर शहराला लागून असलेल्या कांग नदी वरील बोदवड पुलाखाली आढळून आला. तसेच त्यांच्या ताब्यात असलेली मोटरसायकल काही अंतरावर आढळून आली.
या घटनेमुळे जामनेर शहरात घातपात की अपघात याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले. मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
मयत शुभम हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ असल्यामुळे त्यांच्या जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादी वरून जामनेर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान पोलीस विभागातर्फे घडलेल्या घटनेची कसून चौकशी सुरू आहे.