भुसावळ | प्रतिनिधी

पोळा सणाचा उत्साह ओसरत असतानाच भुसावळ शहराला हादरवून सोडणारी रक्तरंजित घटना गुरुवारी रात्री पाटीलमळा परिसरात घडली. भुसावळ रेल्वेत कार्यरत असलेल्या ३५ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याची निघृण हत्या करण्यात आली. तुषार गोविंद सोनवणे (वय ३५, रा. समतानगर, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार सोनवणे हे गुरुवारी रात्री परिचिताची दुचाकी (एमएच १९, सीएच १४०५) घेऊन पाटीलमळा परिसरातून जात होते. त्यावेळी त्यांचा एका अल्पवयीन संशयिताशी कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाले. संशयिताने तुषार यांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि पाठीवर चाकूने वार केले.

या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेनंतर घटनेची माहिती पोलिसांच्या ११२ क्रमांकावर देण्यात आली. माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हल्ल्यानंतर संशयित पायी पसार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या संभाव्य मार्गाचा माग काढला. जळगाव गुन्हे शाखेचे पथकही शहरात असल्याने त्यांनी तपासात सहभाग घेतला. पोलिसांनी वेगाने हालचाली करत अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू करण्यात आला. हत्येच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच हत्येचा कट?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन संशयिताने काही दिवसांपूर्वीच तुषार सोनवणे यांच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तुषार यांचे आपल्या आईसोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा संशय अल्पवयीन आरोपीच्या मनात होता. याच संशयातून निर्माण झालेल्या रागातून त्याने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल तायडे तपास करीत आहेत.
हत्येमागचे गूढ कायम
तुषार सोनवणे यांच्यावर नेमक्या कोणत्या कारणातून जीवघेणा हल्ला करण्यात आला, याबाबतचे संपूर्ण चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. वादाचे नेमके कारण काय होते, हत्येमागे अन्य कोणते कारण आहे का आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व बाबींच्या दिशेने पोलिस तपास सुरू आहे.
पोळा सण शांततेत पार पडल्यानंतर रात्री घडलेल्या या निघृण हत्येमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली असून, पाटीलमळा परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









