जळगाव प्रतिनिधी गणेशोत्सवाचा सण निर्विघ्न पार पाडण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आदेश जारी करत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १४ सराईतांना सहा महिने ते एका वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

हद्दपार केलेल्या १४ जणांमध्ये नशिराबाद पोलीस ठाण्यातील ६, जामनेर पोलीस ठाण्यातील ३, एमआयडीसीतील २, तर रामानंदनगर, जिल्हापेठ आणि फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका गुन्हेगाराचा समावेश आहे. यात अरमान पटेल, अक्रम शहा, हरी पाटील, विपुल नाथ, आवेश खान उर्फ काल्या, मुक्तार शहा, आताल्लाह शाह आणि चेतन उर्फ बटाट्या सुशीर या आठ जणांना एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे,

तर जगन्नाथ कोळी, प्रकाश शिंदे आणि सोपान इंगळे यांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात शांतता भंग करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









