ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

म्हासवे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदीत कारवाई; ६ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळा प्रतिनिधी :ईको वाहनांमधील महागडे धातू चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीच्या पारोळा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी म्हसवे गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर केलेल्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली पासिंगच्या मारुती वॅगनार कारमधून फिरणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ईको वाहनांचे सायलेंसर, सायलेंसरमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधून काढलेले मौल्यवान धातू आणि चोरीचे साहित्य असा ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये यासिफ यामीन चौधरी (वय २२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि आरीफ सलीम (वय २३, रा. अलीगढ, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कारची पाहणी केली असता त्यात सायलेंसर तोडण्याचे अवजार, तीन ईको सायलेंसर आणि १० कॅरीबॅगमध्ये ठेवलेले प्लॅटिनम, पॅलेडियम व रोडियम धातू आढळून आले. पारोळा परिसरातील रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या ईको गाड्यांना टार्गेट करून रात्रीच्या वेळी सायलेंसर चोरण्याचा आरोपींचा प्लॅन होता. याप्रकरणी पोलीस अंमलदार आकाश पाटील यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे पुढील तपास करत आहेत.









