जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळच्या राजकारणात बुधवारी रात्री मोठी राजकीय घडामोड घडली असून, आगामी काळातील राजकीय समीकरणांना यामुळे नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील नंदवन येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि विचारांवर विश्वास व्यक्त करत प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांचे सुपुत्र निखिल चौधरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशामुळे भुसावळच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यासोबतच आगामी काळात नवे राजकीय समीकरण आकाराला येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भुसावळ आणि जळगाव जिल्ह्याच्या विकासाला गती देणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, हा या राजकीय निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या पक्षप्रवेशावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, बच्चू कडू, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, सरिता माळी-कोल्हे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अनिल चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि निखिल चौधरी यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भुसावळमध्ये पक्षाची राजकीय ताकद किती वाढणार, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाचा नेमका परिणाम काय होणार, याकडे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पक्षप्रवेशामुळे भुसावळच्या राजकारणातील पुढील डावपेचांना वेग येण्याची शक्यता असून, येत्या काळात कोणते नवे राजकीय समीकरण आकाराला येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








