अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर पोलिसांनी तालुक्यातील जानवे गावाजवळील पत्री शेडमध्ये छापा टाकून भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ४ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास जानवे ते इंदापिंप्री गावाच्या रस्त्यावरील पत्री शेडमध्ये भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अमळनेर पोलिसांनी छापा टाकला.

दुधात सोयाबीन तेल मिसळून भेसळ..
पोलिसांच्या कारवाईत आकाश कैलास बोऱ्हाडे (वय ३०, रा. जानवे, ता. अमळनेर) आणि महेश दिलीप पाटील (वय २७, रा. जानवे, ता. अमळनेर) यांच्याकडून भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. पोलिसांच्या माहितीनुसार, गायीच्या दुधाची फॅट वाढविण्यासाठी सोयाबीन तेलाचा वापर केला जात होता. १० लिटर भेसळयुक्त दूध तयार करून ते १०० लिटर गायीच्या दुधात मिसळले जात असल्याचा आरोप आहे. हे भेसळयुक्त दूध पुढे विक्रीसाठी धुळे येथे पाठविले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई..
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव यांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून भेसळयुक्त दूध आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांना अटक..
या प्रकरणातील संशयित आकाश बोऱ्हाडे आणि महेश पाटील यांना ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.या कारवाईत अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर व पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.









