जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे दोन दिवसीय ‘गरबा नी गूंज- दांडिया नाईट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक गरबा वेशभूषा परिधान करून संगीताच्या तालावर गरबा आणि दांडियाचे आकर्षक सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ. अनिकेत पाटील आणि डॉ. सुहास बोरले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने फेटे बांधून स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन आणि नवदुर्गा आरतीने कार्यक्रमाचा मंगलमय प्रारंभ झाला.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर, उपप्राचार्या प्रा. जॅसिंथ धाया आणि प्रा. अश्विनी वैद्य उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंदही उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. महाविद्यालयाचा परिसर आकर्षक रोषणाई आणि पारंपरिक सजावटीने सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या नृत्यकौशल्याचे, ऊर्जेचे आणि सांघिक भावनेचे दर्शन घडविले.
या कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट गरबा सादरीकरणासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘गरबा रील स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली होती. विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या कलागुणांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन स्नेहल जांभुळकर, दिव्याना पवार, मंजिरी मडावी, सूरज खवाटे आणि सुमित भरांबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अरुण चौधरी आणि गणेश नांदुरकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे, सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे, आत्मविश्वास वाढविणे आणि सांघिक भावना वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.









