कामातील निष्काळजीपणा भोवला; जळगाव महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील निलंबित

जळगाव प्रतिनिधी

जळगाव: जळगाव मंडलातील वा ढते रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बिघाड, ६७ कोटी रुपयांहून अधिक थकीत वीजबिल आणि वीजचोरीच्या हजारो प्रकरणांमध्ये अपेक्षित कारवाई न केल्याचा ठपका ठेवत महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद चंद्रकांत पाटील यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी १९ ऑगस्ट रोजी हे निलंबनाचे आदेश जारी केले. या धडक कारवाईमुळे महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

निलंबन आदेशानुसार, पाटील यांच्या कार्यक्षेत्रातील चोपडा शहरी उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गंभीर बिघाड झाला होता. तसेच, २०२६-२७ या वर्षासाठी रोहित्र नादुरुस्तीची स्वीकारार्ह मर्यादा ४.२० टक्के निश्चित करण्यात आली असताना प्रत्यक्षात हे प्रमाण १०.२६ टक्क्यांवर पोहोचले होते. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आलेले अपयश, जुलै २०२६ अखेर झालेली ६७ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी आणि उघडकीस आलेल्या ३,१६४ वीजचोरीच्या प्रकरणांपैकी तब्बल २,१६९ प्रकरणांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करणे, या सर्व बाबी गंभीर गैरवर्तनात मोडत असल्याने ही कारवाई करण्यात आली. निलंबन काळात पाटील यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांना नाशिक मुख्य अभियंता कार्यालयात आठवड्यातून दोनदा हजेरी लावावी लागणार आहे.









