जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिक, पोलीस आणि समाज यांच्यातील विश्वास, सहकार्य व सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पत्रकारांसाठी “विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार-जनता सहकार्य छायाचित्र स्पर्धा” आयोजित करण्यात आली असून, १९ ऑगस्ट या ‘जागतिक फोटोग्राफी दिना’चे औचित्य साधून या विशेष उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

छायाचित्र हे केवळ चित्र नसून समाजातील वास्तव, भावना, संघर्ष, सेवा, कर्तव्य आणि प्रेरणा यांचे प्रभावी दस्तऐवजीकरण असते. पत्रकार समाजातील महत्त्वाच्या घटकांचे साक्षीदार असतात आणि कॅमेऱ्याद्वारे ते क्षण इतिहासात जतन करतात. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्याबरोबरच समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या छायाचित्रांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.

ही स्पर्धा पोलीस इन पब्लिक सर्व्हिस, प्राईम/क्राईम, सोशल, ट्रॅफिक, जळगाव हेरिटेज, स्पोर्ट्स आणि वुमन एम्पॉवरमेंट या ७ विविध वर्गवारींमध्ये आयोजित केली आहे. स्पर्धकांनी आपले फोटो १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत ९७०२२००३१५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवायचे असून, प्राप्त झालेले फोटो पोलिसांकडून मोठे करून १५ ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालय, जळगाव येथील पद्मालय हॉल येथे आयोजित प्रदर्शनात प्रदर्शित केले जातील.

या स्पर्धेतील सर्व ७ वर्गवारींमधील प्रथम तीन विजेत्यांना जळगाव जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या छायाचित्रांमधून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग आणि सेवाभावाचे प्रभावी दर्शन घडवावे, असे आवाहन जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.








