गजानन पाटील | अमळनेर, दि. 05 – देशात स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असली तरी, अमळनेर तालुक्यात असलेल्या सात्री गावाच्या नरक यातना कमी व्हायला तयार नाहीत. सात्री गाव एखाद्या छोट्या बेटा प्रमाणे असून तालुक्यावर येण्यासाठी बोरी नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावाचा नेहमी संपर्क तुटतो. त्यामुळे आरोग्य, शैक्षणिक, शेतीमाल आदी प्रकारच्या समस्या दरवर्षी उद्भवतात.
मागील वर्षी तर पावसाळ्यात एका बलिकेला वेळेवर उपचार होऊ न शकल्याने तिचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यांच्या संतप्त आंदोलनानंतर प्रशासनने रस्ता बनवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन देखील हवेत विरले. शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य बाजारात न्यायला रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. दरम्यान शासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार होत आहे.
नदीत पाणी कमी झाल्यानंतर देखील पात्रातून ट्रॅक्टर काढण्यासाठी पुढे एक ट्रॅक्टर ओढायला आणि मागाहून जेसीबी मशीन ढकलायला लागते. ही सुद्धा खर्चिक बाब असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर गावकरी पुढे सरसावले आहेत. लोकसहभाग आणि श्रमदानातुन तात्पुरत्या स्वरूपात का होईना त्या ठिकाणी मुरूम टाकून सपाटीकरण केले जात आहे. त्यामुळे या ठीकाणी ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा प्रत्यय प्रत्यक्षात आला असल्याचे बोलले जातेयं.
https://youtu.be/hwvWsthI8j0