जळगाव, (प्रतिनिधी) : पोहता येत नसतानाही नदीच्या पात्रात मृत्यूशी झुंज देणाऱ्या चार मुलांसाठी १४ वर्षीय उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील हा प्रत्यक्ष ‘देवदूत’ ठरला. ओमने दाखवलेल्या या अतुलनीय धाडसाची दखल घेत जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने त्याच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
चोपडा तालुक्यातील गणपूर येथील चार अल्पवयीन मुले (वय १६) अनेर नदीत स्नानासाठी उतरली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने ही चौघेही बुडू लागली. याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या ओम पाटील याने क्षणाचाही विलंब न लावता नदीच्या डोहात उडी घेतली. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने एकामागून एक अशा चौघांचेही प्राण वाचवले.
ओम सध्या गावातीलच विकास विद्यालयात ८ वीच्या वर्गात शिकत आहे. त्याचे वडील रवींद्र पाटील आणि आई सारलाबाई हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, पत्र्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाला मुलांच्या शिक्षणाची मोठी चिंता होती. ओमचा मोठा भाऊ ११ वीत शिकत असून, आर्थिक ओढाताणीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे येत होते. ओमने दाखवलेले शौर्य हे केवळ कौतुकास्पद नसून प्रेरणादायी आहे. परिस्थितीमुळे अशा गुणवान मुलाचे शिक्षण थांबू नये, यासाठी जैन इरिगेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने त्याच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
“संपत्तीच्या गरजेपेक्षा मनाच्या मोठेपणाची आज सर्वात जास्त गरज आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन तथा श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या या विचारांचा वारसा जैन परिवारावर आहे. संस्कारशील विचारांचा आधार या कार्याला आहे. समाजातील गरजू विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जैन इरिगेशन कायमच अशा मुलांना मदतीचा हात देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.”
अशोक जैन
अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड








