पाचोरा, (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने केलेली गॅस दरवाढ आणि तालुक्यात फोफावलेला गॅसचा काळाबाजार याविरोधात पाचोरा तालुका काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढत्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना प्रशासनाने गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत घोषणाबाजी केली.
आंदोलकांनी तहसीलदार विजय बनसोडे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे गॅसचे भाव गगनाला भिडले असताना, दुसरीकडे गॅस सिलिंडरची अवैध विक्री आणि काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी सचिन सोमवंशी, शेख इरफान शेख मन्यार, शरीफ शेख,
संदीप पाटील, शंकर सोनवणे यांच्यासह प्रवीण पाटील, अण्णा पाटील, चेतन बोदवडे, प्रशांत पाटील, जुगराज भोई, भगवान भोई, राहुल मराठे, दिलदार पठाण आदींसह काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








