जळगाव, दि. 01 – गोरगरीब जनतेसाठी रेशन दुकानदारांवर नियंत्रण ठेवण्याकरिता पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार तथा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शहरी दक्षता समितीची नियुक्ती झाली होती. मात्र समिती निष्क्रिय ठरली असून, त्याविषयी जाब विचारणारे तसेच विविध माहिती मागणारे दक्षता समिती सदस्य तथा मनपाचे स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांना समितीच्या व्हाट्स अप ग्रुप मधून चक्क तहसीलदारांनीच ‘रिमूव्ह’ केल्याने समिती सदस्य पदाचा लवकरच समितीचे अध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्याकडे राजीनामा देणार असल्याची माहिती प्रशांत नाईक यांनी दिली आहे.
शहरी दक्षता समिती गेल्या ६ महिन्यापासून नेमण्यात आलेली आहे. समिती सदस्यांची ओळख परिचयाची बैठक सोडली तर, याशिवाय समितीची एकही बैठक झाली नाही. समिती केवळ नावापुरता राहिली असल्याचा आरोप सदस्य प्रशांत नाईक यांनी केला आहे. यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे देखील नाईक यांनी सांगितले.
गोरगरीब जनतेला धान्य मिळत आहे की नाही तसेच त्यांच्या तक्रारी, समस्या याबाबत समितीची कुठलीही बैठक झालेली नाही. तसेच रेशनिंग दुकानदारांच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत समिती नेमली होती. या समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला आहे. मात्र शहरी दक्षता समितीच्या सदस्यांना हा अहवाल का उपलब्ध करून दिला जात नाही. असा सवाल देखील नाईक यांनी उपस्थित केला आहे.
१२३ दुकानदारांनी नागरिकांचे थम्ब इम्प्रेशन घेतले. त्याबाबत धान्य उचल केले. मात्र त्यांना धान्य दिले नाही अशी नागरिकांची तक्रार आहे. या प्रकरणाविषयी देखील सातत्याने माहिती मागितली असता, तहसीलदार यांनी माहिती दिली नसल्याचे नाईक यांनी सांगितले.
तसेच समिती सदस्य प्रशांत नाईक यांनी शहरी दक्षता समितीच्या तहसीलदारांच्या व्हाट्सअप ग्रुप वर प्रश्न विचारले असता, तहसीलदारांनी उत्तर देण्याचे टाळून सदस्य असलेल्या प्रशांत नाईक यांना ‘रिमूव’ करीत ग्रुपबाहेर केले. त्याचबरोबर रेशन दुकानदारांचा संबंधित असलेल्या तक्रारी, समस्याचा निपटारा होत नसल्याने व समिती केवळ नावाला असल्याने लवकरच शहरी दक्षता समिती सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे सदस्य प्रशांत नाईक यांनी कळविले आहे.