जळगाव/भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात आज एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे. दोन अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींना विहिरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, संतप्त ग्रामस्थांनी त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत दोन्ही मुली साकरी गावातीलच रहिवासी असून त्या शाळेत शिक्षण घेत होत्या. आज सकाळी त्या नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, गावाजवळील एका विहिरीजवळ त्यांना गाठून संशयित आरोपीने विहिरीत ढकलून दिले. यात दोन्ही चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात; ग्रामस्थांचा संताप..
पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी याला तातडीने ताब्यात घेऊन भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात नेले आहे. मात्र, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत संतप्त जमावाने पोलिसांशी वाद घातला. यामुळे पोलीस ठाणे आणि साकरी गाव परिसरात मोठी गर्दी जमली असून परिस्थिती तणावपूर्ण बनली.
घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मात्र, मृतदेह बाहेर काढण्यास आणि पुढील प्रक्रियेस विलंब होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. ‘आरोपीवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा’, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
संशयित आरोपी रोहन चौधरी याने हे टोकाचे पाऊल का उचलले? मुलींशी त्याचे काय नाते किंवा वाद होता? याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत. या घटनेने साकरी गावावर शोककळा पसरली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.








