पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून तडकाफडकी बाहेर तर मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना
जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाला असून, आज (दि.२८) रविवारी झालेल्या बैठकीत महायुतीची चर्चा अखेर फिस्कटली आहे. भारतीय जनता पक्षाने आता ७५ जागांवर ‘स्वबळावर’ लढण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, यामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे उदयाला येण्याची शक्यता आहे.
अजिंठा विश्रामगृहात रंगले नाट्य..
रविवारी सकाळी १० वाजेपासून अजिंठा विश्रामगृह येथे महायुतीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, निवडणूक प्रभारी आ. मंगेश चव्हाण आणि आ. राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, जागांच्या आकड्यावरून सुरू झालेली चर्चा वादात रूपांतरित झाली.
२५ जागांचा आकडा ठरला कळीचा मुद्दा..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने (शिंदे गट) त्यांच्याकडे असलेल्या विद्यमान २५ “विनिंग सीट्स” (निवडून येण्यायोग्य जागा) लक्षात घेता २५ जागांची आग्रही मागणी केली होती. मात्र, भाजपने शिवसेनेला १९ आणि राष्ट्रवादीला (अजित पवार गट) ६ जागा देण्याचा प्रस्ताव मांडला. शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य नसल्याने बैठकीत तणाव निर्माण झाला. आपल्याला अपेक्षित जागा मिळत नसल्याचे पाहून पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून तडकाफडकी उठून निघून गेल्याची खात्रीलायक माहिती आहे.
या राजकीय घडामोडींनंतर आता जळगाव महापालिकेत ‘त्रिशंकू’ लढत होणार की भाजप एकहाती सत्ता मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या या ‘स्वबळ’ भूमिकेमुळे मित्रपक्ष आता कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अधिकृत घोषणा सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.








