जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय अभिजात संगीताचा सांस्कृतिक मानदंड म्हणून ओळखला जाणारा २४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव जळगाव येथे दिनांक ९, १० व ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या (रौप्य महोत्सवी वर्ष) वतीने हा महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत संपन्न होणार आहे.
या महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत:
पहिला दिवस (९ जानेवारी): आसामची गुणी गायिका श्रृती बजरबरुहा (शास्त्रीय/उपशास्त्रीय गायन).
जागतिक कीर्तीचे सतार वादक चिराग कुट्टी यांचे सतार वादन.
दुसरा दिवस (१० जानेवारी): उस्ताद सुलतान खान यांचे चिरंजीव उस्ताद साबीर खान यांचे जगविख्यात सारंगी वादन. निधी प्रभू (कथ्थक) आणि कुणाल ओम (फ्लेमिंको) यांची अप्रतिम कथ्थक-फ्लेमिको जुगलबंदी.
तिसरा दिवस (११ जानेवारी): प्रख्यात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायिका यशस्वी सरपोतदार यांचे गायन.
’कॅर्नाटिक क्वॉर्टेट’ हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत (श्रेया देवनाथ- व्हायोलीन, एम कार्तिकेयन- नादस्वरम्, प्रविण स्पर्श- मृदुंगम्, गुम्मीडिपौंडी जीवा- तबिल) यांचे सहवादन.
यासोबतच जळगावच्या नुपूर खटावकर व सहकारी गणेश वंदना सादर करतील. या तीन दिवसीय स्वरोत्सवाचे सूत्रसंचालन मंगला खाडिलकर करणार आहेत.

तरुण आणि जुन्या पिढीने या संगीताच्या मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रवेशिकेसाठी दीपिका चांदोरकर (मो. ९८२३०७७२७७) यांच्याशी संपर्क साधावा.








