जळगाव, (प्रतिनिधी) : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त यावर्षी जळगाव शहरात लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानतर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मुंडे साहेबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या समाजबांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकारी यांच्या मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे रॅलीत उत्साहाचे वातावरण दिसून आले.
रॅलीचा शुभारंभ शिवतीर्थ मैदानाजवळ येथून झाला. तर समारोप लाडवंजारी समाज मंगल कार्यालय येथे झाला. संत ज्ञानेश्वर प्राथमिक-माध्यमिक विद्यालय आणि श्रीराम कन्या प्राथमिक-माध्यमिक विद्यालय यांच्या लेझीम पथकाच्या तालबद्ध प्रदर्शनाने रॅलीला विशेष शोभा प्राप्त झाली. दरम्यान लाडवंजारी समाज मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रेड क्रॉस ब्लड बँक यांच्या सहकार्याने एकूण २० समाज बंधूंनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या कार्यक्रमाला माजी महापौर सीमा भोळे, दिपक सूर्यवंशी, अशोक लाडवंजारी, राजेंद्र घुगे पाटील, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लाड, सेक्रेटरी प्रवीण सानप, उपाध्यक्ष विजय लाडवंजारी जयंती आयोजन समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक आदींसह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.








