जळगाव, दि. 16 – मराठी व इंग्रजीतील जगप्रसिद्ध कवी अरूण कोल्हटकर यांच्या भिजकी वही या प्रसिद्ध कविता संग्रहातील कवितांचे नाट्यात्मक सादरीकरण परिवर्तनच्या कलावंतानी भावांजली महोत्सवात केले. जगभरातील आदिम काळापासूनच्या महिलांच्या वेदनांची कविता असलेल्या हा संग्रह अतिशय वेगळा व कठीण समजला जातो. परिवर्तनच्या दिग्दर्शक पुरुषोत्तम चौधरी यांनी आपल्या दिग्दर्शकीय कौशल्यातून या कवितांचे नाट्यात्मक सादरीकरण अतिशय प्रवाहीपणे परिवर्तनच्या कलावंतांकडून करवून घेतले तसेच या नाट्यरुपांतराची संकल्पना नीलिमा जैन आणि निर्मिती प्रमुख वसंत गायकवाड आणि भाऊसाहेब पाटील हे होते.
या प्रसंगी काळानुसारची पुरक वेशभूषा व रंगभूषा, देखणे नेपथ्य, अतिशय समर्पक प्रकाशयोजना या वैशिष्ट्यांनी हा प्रयोग रसिकांना अंतर्मुख करून गेला. महिलांचे दुःख हे जागतिक आहे. जगातील अनेक अशा कर्तृत्वान महिला आहेत त्यांची कविता नाट्यरूपाने रंगमंचावर आली. त्यात ‘टिपं’ – जयश्री पाटील, ‘अपाला’ – हर्षदा कोल्हटकर, ‘मेरी’ – अंजली पाटील, ‘हिपेशिया’ – प्रतिक्षा, ‘रबिया’ – सुदिप्ता सरकार, ‘मजनू’ – राहूल निंबाळकर व मोना निंबाळकर, ‘लैला’ – सोनाली पाटील – शंभू पाटील, ‘मैमुन’ – मंजुषा भिडे या नाट्यकर्मींनी कवितांचे सादरीकरण केले. तर हर्षल पाटील, नारायण बाविस्कर मनोज पाटील मंगेश कुलकर्णी, मिलिंद जंगम आणि शंभू पाटील यांनी कवितांचे निवेदन केले. ज्यातून कविता सहज उलगडली गेली.
कार्यक्रमासाठी अशोकभाऊ जैन, आनंद मल्हारा, ऍड. जमील देशपांडे, सुहास वेलणकर, अनंत जोशी, प्रा. किशोर पवार, अशोक कोतवाल, संदीप देवरे, दिलीप तिवारी हे प्रमुख अतिथी होते. सुत्रसंचलन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.