जळगाव, (प्रतिनिधी) : आपल्या उत्तम खेळीचे प्रदर्शन करत पंजाब संघाने कर्नाटक संघावर २-० ने विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्षी १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत विजयश्री खेचून आणली. उपविजेता संघाने देखील आपला सुयोग्य बचाव केला त्यांना उपविजयी म्हणून समाधान मानावे लागले. खेळ आला तिथे हार जित तर होणारच. फुटबॉल हा असा खेळ आहे की, ज्याने सांघिक भावना व समन्वय यांची वृद्धी होते. खेळाडूंनी खेळाडूवृत्ती जोपासणे गरजे असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले. त्यांच्या हस्ते विजयी उपविजयी संघाचा चषक, रोख पारितोषिकाचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सीआयएससीईचे अर्णवकुमार शॉ, सिद्धार्थ किर्लोस्कर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, मुख्य पंच ललिता सावंत, जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारूख शेख, जैन इरिगेशनचे अभंग जैन, जैन स्पोर्टस अॅकडमीचे अरविंद देशपांडे, प्रशिक्षक अब्दुल मोहसीन आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान..
संपूर्ण स्पर्धेत बेस्ट गोलकिपर म्हणून महाराष्ट्राची फातेमा दलाल ही सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत सर्वाधिक १० गोल पंजाबची जोया हसन हिने केले त्यामुळे तिचा विशेष सन्माचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे अंतिम सामान्यातही ती मॅन ऑफ द मॅच ठरली. बेस्ट डिफेन्ससाठी पंजाबची खेळाडू सोनिया अटवाल हिचा सन्मान झाला. ग्रीनवुल्ड हायस्कूल कर्नाटकची खेळाडू अर्पिता तानिया हिचा ही गौरव करण्यात आला.
अर्णव शॉ यांनी देखील मनोगत व्यक्त करीत अनुभूती स्कूल मधील उत्तम आयोजनाबाबत प्रशंसा केली. त्याचप्रमाणे बाबा हरीसंग मॉर्डन स्कूलच्या खेळाडूंचे कौतूक केले. निशा जैन यांनी अनुभूती स्कूलला यजमान पद मिळाल्याबद्दल सीआयसीएसईचे आभार मानले व पुढे क्रिकेट व तायक्वांडो मध्ये अशाच स्पर्धांचे नियोजन भविष्यात करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. मुख्य पंच ललिता सावंत यांनी स्पर्धेतील बारकाव्यांसह वैशिष्ट्ये सांगितली. मान्यवरांचे स्वागत अशोक जैन व अतुल जैन यांनी केले. सूत्रसंचालन पलक संघवी हिने केले. प्राचार्य देबासिस दास यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., अनुभूती निवासी स्कूल, जैन स्पोर्टस अॅकडमीच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.