जळगाव, दि. 10 – सर्वत्र 5 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय स्तरावर जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी मृदा या विषयावर डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय व दैनिक ॲग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमानाने अडावद तालुका चोपडा येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मोनिका नाफडे- भावसार व साहाय्यक प्राध्यापक निलेश भागवत सदार यांनी मार्गदर्शन केले. सोबत Agrone चे अधिकारी उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अडावद बाजार समितीचे सभापती दिनकर देशमुख होते. प्रा. निलेश सदार यांनी शेतकऱ्यांना जमीन सुपीकते बाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कार्बन हा जमिनीचा आत्मा आहे. जमिनीची सुपीकता कमी होत आहे, त्याचे कारण म्हणजे रासायनिक खतांचा वापर, जमिनीमध्ये असलेले कमी सेंद्रिय कर्ब (0.3 ते 0.6), एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन न करणे, पिकाची फेरपालट न करणे, जमिनीची धूप होणे इत्यादी कारणे ही जमीन सुपीकता कमी होण्यासाठी आहेत. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी रासायनिक खतांचा समतोल वापर करणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे, हिरवळीच्या खताचा वापर करणे, जमिनीमध्ये शेणखत ,गांडूळ खत, जैविक खतांचा, वापर करणे आता गरजेचे बनलेल आहे.
प्रा. मोनिका नाफडे – भावसार मॅडम म्हणाल्या जमिनीची सुपीकता कशी आहे हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीचे मृदा पत्रिका तर जवळ बाळगणे गरजेचे आहे. व त्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता पुढाकार घ्यावा. माती परीक्षण व्यवस्था डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथे करण्यात आली आहे. माती मध्ये प्रथम व दुय्यम अन्नद्रव्य बरोबर सुक्षम अन्नद्रव्यांची गरज असते शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
माती परीक्षण बरोबरच पाणी परीक्षण करून त्यामधील क्षारतां, सामू, सोडियम कॅल्शियम, इत्यादी पाण्याच्या गुणधर्मानुसार शेतीला पाणी देण्याची गरज आहे. अन्यथा जमिनीत चोपण बनतील. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म चांगले असणे म्हणजे जमिनीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे.