जळगाव, (प्रतिनिधी) : निंभोरा पोलिसांनी अनिल रामलाल बारेला (रा. खिर्डी खुर्द, ता. रावेर) या व्यक्तीला दोन गावठी बनावटीच्या पिस्तूलसह अटक केली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत १८,०००/- रुपये आहे. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ मे २०२५ रोजी निंभोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, खिर्डी खुर्द येथील नीळकंठ पुंडलिक बढे यांच्या गट क्र. ३४९ मधील केळीच्या शेतातील वाड्याच्या बाजूला अनिल रामलाल बारेला हा त्याच्या ताब्यात अवैध गावठी पिस्तूल बाळगून आहे. या माहितीच्या आधारे, सपोनि बोचरे यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, योगेश चौधरी, सुरेश पवार, अमोल वाघ, प्रभाकर धसाळ, सर्फराज तडवी आणि रशिद तडवी यांचे पथक तयार केले. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला आणि संशयित अनिल बारेला याला ताब्यात घेतले.
पंचासमक्ष अनिल बारेला याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ मॅगझिनसह दोन गावठी बनावटीची पिस्तूल मिळून आली. जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलची एकूण किंमत १८,०००/- रुपये आहे. त्यानंतर अनिल रामलाल बारेला याला निंभोरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोकॉ सर्फराज तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अभय ढाकणे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.