मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : विधान परिषदेचे आ. एकनाथराव खडसे यांच्या चारचाकी वाहनाला एका बोलेरो वाहनाच्या चालकाने धडक दिल्याने किरकोळ अपघात झाला आहे. सुदैवाने आ. खडसे यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. सदर घटना दि.१३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेली नाही.
तालुक्यातील कोथळी येथून आमदार खडसे हे चालक, सुरक्षारक्षक यांचेसह मुक्ताईनगर शहरामध्ये १३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शहरातील प्रवर्तन चौकामध्ये आमदार खडसे यांचे वाहन (क्रमांक एमएच १९ सीजे ३३०३) येत असताना विरुद्ध बाजूने येत असलेल्या बोलेरो क्रमांक (एमएच १२ केजे ७०५) वरील चालकाने आमदार खडसे यांच्या वाहनाला ड्रायव्हर बाजूला समोरून धडक दिली. सुदैवाने आ. खडसे यांना कुठलीही दुखापत झाली नसून वाहनाचे किरकोळ खरचटल्याने नुकसान झाले आहे. आ. खडसे यांच्याकडून कुठलीही तक्रार नसल्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सांगितले.