जळगाव, (प्रतिनिधी) : शेती परवडत नाही असे म्हटले जाते ही नकारात्मकता दूर झाली पाहिजे. नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतीतुन मिळते फक्त नियोजन करून तंत्रज्ञानासोबत शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणे करून शेती परवडेल, लहानपणापासूनच शेतीविषयी आवड असेल तर यात यशस्वी होता येते. मजूरांची टंचाईसह अन्य समस्या निर्माण होत असतात, मात्र त्यावर शाश्वत सोल्यूशन काढावे लागते त्यासाठी जैन इरिगेशन प्रयत्न करते असे मनोगत फाली सुसंवादामध्ये सहभागी शेतकऱ्यानी व्यक्त केले.
भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अकरावे अधिवेशनची आज जैन हिल्सला सुरवात झाली. शेतकऱ्यांच्या सुसंवादात, शेतीविषयी समाजात उदासिनेतवर जास्त चर्चा केली जाते, परंतु सकारात्मक बाबींवर चर्चा केली पाहीजे फाली उपक्रमात ते दिसते. प्रत्येकाला रोज अन्न लागतेय त्यामूळे शेतीला भविष्य आहे फक्त ती उद्योजकीय दृष्टीने त्याकडे बघीतले पाहिजे. संकटात सुध्दा सोल्यूशन मिळते तसे प्रयत्न केले पाहिजे. बाजारातील मागणीप्रमाणे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले पाहिजे. हमी भावाची शेती परवडत आहे. यासाठी करार शेती महत्त्वपूर्ण आहे. कृषिक्षेत्राला नकारात्मकतेतुन सकारात्मक दिशा देण्याचे काम जैन हिल्स वरून होत आहे. प्रत्येक पावलावर समस्या आहे मात्र त्यासोबत त्याचे उत्तर ही मिळत असते. शेतीविषयी सर्वतोपरी तंत्रज्ञानाची माहिती ठेवली पाहिजे. असा केळी, पपई, कांदा, हळद, कापूस, टोमॅटो, टरबूज, मका, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी सुसंवाद साधला. बाजारपेठ, मार्केंटिग, फ्रुटकेअर व्यवस्थापन, निर्यातक्षम उत्पादनासाठी घ्यायची काळजी, हवामानातील बदल, केळी उत्पादनाचे नफ्याचे गणिते, शेती आणि शिक्षणासह जैन तंत्रज्ञान यासह विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना विचारले. निलेश पाटील (जामनेर), चंद्रकांत रामदास सोनाळकर (पहुर), छोटुराम तुकाराम पाटील (वाकि ता. जामनेर), पद्माकर जगन्नाथ पाटील (तराळि ता. चोपडा), गोविंदा गोळे बोदवड या शेतकऱ्यांनी भविष्यातील शेतीविषयी मार्गदर्शन केले. जान्हवी नंगेश्वर, लक्ष्मी पाटील, प्रणव शिंदे, प्रगति सांगोळे, नंदिनी दहिकर, राशि मराठे, संतोष सावंत, आरव बंडि, लावण्या पाटील, श्रेया बरकले, मंदिरा शिंदे या फाली विद्यार्थ्यांनी लिड केले. जुली पटेल, रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
पहिल्या टप्प्यातील पहिला दिवस..
फाली उपक्रमात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, व मध्यप्रदेश राज्यातील ५०० विद्यार्थी व फालीचे शिक्षक सहभागी झाले. पहिल्या दिवशी जैन हिल्स येथील परिश्रम, जैन हिल्स शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्र, ड्रीप डेमो, अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्ट डेमो प्लॉट, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू, टिश्यू कल्चर येथे भेट दिली. जगप्रसिद्ध अशा गांधी तीर्थच्या म्युझियमला देखील भेट दिली. त्याचप्रमाणे टिश्युकल्चर पार्क, फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन तेथील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अधिकारी, सहकारी तसेच फालीचे हर्ष नौटियाल यांनी परिश्रम घेतले.
अधिकारी व शेतकरी यांच्यासमवेत विद्यार्थ्यांची गट चर्चा..
दुपार सत्राच्या या कार्यक्रमात परिश्रम जैन हिल्स येथे गट चर्चा झाली यामध्ये जैन इरिगेशनचे तज्ज्ञ डॉ. अनिल ढाके, अतिन त्यागी, संजय सोनजे, जगदीश पाटील हे तसेच डॉ. बिभूति पटनाईक (स्ट्रार ॲग्री), सुरज पानपट्टे (ॲग्री वेश), अरूण श्रीमालि(प्रोमेप्ट), शैलेंद्र जाधव, अंकिता (आयटी सि), वैभव भगत (उज्जवन), डॉ.विनोद चौधरी (गोदरेज फूड), त्याच प्रमाणे यावल तालुक्यातील राजोरा येथील प्रगतशील शेतकरी दिपक सतिश पाटील, राहुल अरूण पाटील (दापोरा- बु-हाणपूर) सहभागी झाले होते.
फाली चा ११ वा वर्धापन दिन..
फाली कार्यक्रमाचा आज ११ वा वर्धापन दिन होता या निमित्ताने फालीच्या संस्थापिका नॅन्सी बॅरी यांच्यासह शिक्षक, अधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितित केक कापण्यात आला.
आज इनोव्हेशन आणि व्यवसाय योजनांचे सादरीकरण..
फाली ११ मध्ये सहभागी होणाऱ्या शाळांमधील फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. हे विद्यार्थी जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंड कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी सादरीकरण करणार आहेत.