जळगाव, दि. 27- महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारी महत्वाची संस्था असलेल्या परिवर्तन जळगाव संस्थेची निर्मिती असलेल्या महोत्सवाचे धुळ्यात दि. २६ ते २८ नोव्हेंबर असे तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. हरिजन सेवक संघ व यंग फाउंडेशन या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. हा महोत्सव जेष्ठ रंगकर्मी यादव खैरनार यांच्या नावाने घेतला जातोय.
महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून कोरोनामुळे दोन वर्षांचा खंड पडला. पण पुन्हा जोमाने धुळ्यात सांस्कृतिक उपक्रमांना गती देण्यासाठी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. माजी मंत्री डॉ हेमंतनाना देशमुख, माजी कुलगुरू डॉ एन. के. ठाकरे, प्रा रंजना खैरनार हे मार्गदर्शक आहेत. तर महोत्सव प्रमुख मधुकर शिरसाठ, प्रा विलास चव्हाण, जगदीश देवपूरकर, डॉ योगिता पाटील, डॉ सदाशिव सूर्यवंशी व यंग फाउंडेशनचे संदीप देवरे आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली यादव खैरनार परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परिवर्तन ही आता परिवर्तनशील व प्रयोगशील संस्था म्हणून केवळ खानदेशाला नाही तर महाराष्ट्राला सुपरिचित अशी सांस्कृतिक चळवळ झालेली आहे .
महोत्सवाचे उद्घाटन माजी कुलगुरू एन के ठाकरे यांच्या कवितेच्या वाचनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले प्रसिद्ध मराठी कवी अरूण कोल्हटकर यांच्या “भिजकी वही”चे अभिवाचन परिवर्तनच्या कलावंतांनी केले. ‘अपाला’ वेदकालीन स्त्री जी वेदाभ्यासाने संपन्न स्त्रिला रूपामुळे कसं नाकारलं जातं याची व्यथा होय. म्हणजे स्त्रीचं फक्त रूप पाहिलं जातं हे अपालाच्या माध्यमातून हर्षदा कोल्हटकर यांनी मांडलं. आईचं दुःख काय असतं, वेदना काय असतं मुलगा कितीही मोठा असो आईची वेदना किती खोल असते. हे अत्यंत सुंदर रूपाने ‘मेरी’च्या माध्यमातून अंजली पाटील यांनी मांडलं.
यानंतर ‘हिप्पेटीया’ ही जगातील विद्वान जिचं क्रोनिकल सेक्शनवरचं भाष्य अतिशय प्रसिद्ध आहे. त्या विपाशाची हिपेटीयाची शोकांतिका प्रतिक्षा कल्पराज यांनी अत्यंत उत्कटतेने मांडली. ‘रबिया बसरी’ या नावाने ओळखली जाणारी सुफी संत आणि तिची भक्ती तिचं ‘प्रेम इश्के हकिकी’ हा तिचा मुद्दा या सगळ्या गोष्टी अत्यंत भक्तीभावाने आणि सुरेखपणे सुदिप्ता सरकार यांनी व्यक्त केल्या.
‘मजनू’ – लैला आणि मजनू ही प्रसिद्ध दंतकथा असून यामुधील मजनू अपूर्वा पाटील यांनी अत्यंत थाटात साकारला तर लैलेच्या तळघरातील दुःख अत्यंत भावूकपणे सोनाली पाटील यांनी सादर केलं. ‘मैमुन’ – मैमुनची गोष्ट अंगावर शहारे आणणारी आणि ती घटना हादरवून टाकणारी होती. त्याला आपल्या अभिनय सामर्थ्याने पेलत मंजुषा भिडे यांनी अत्यंत ताकतीने मैमुन सादर केली. या संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप अतिशय सुंदरपणे जयश्री पाटील यांनी ‘टिपं गळतात टिपं’ सादर करत अश्रू गाळणा-या या कार्यक्रमाला एक आशावादाची किनार दिली. संकल्पना निलीमा जैन यांची होती तर दिग्दर्शन पुरूषोत्तम चौधरी यांचे तर निर्मिती प्रमुख होरिलसिंग राजपूत व प्रा मनोज पाटील हे होते. प्रकाश योजना राहुल निंबाळकर यांची होती. कार्यक्रमाचे निवेदन शंभू पाटील यांनी केले.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्रीकांत देशमुख लिखित व शंभु पाटील नाट्यरूपांतरीत ‘नली’ एकलनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. नाटकाचे दिग्दर्शन योगेश पाटील यांचे तर व सादरकर्ते हर्षल पाटील होते. महोत्सवाचा समारोप
तिसऱ्या दिवशी २८ नोव्हेंबर रविवारी जगप्रसिद्ध भारतीय लेखिका अमृता प्रतिम यांच्या जिवनावर आधारित “अमृता साहिर इमरोज” हे नाटक सादर होणार आहे.
या महोत्सवाचं आयोजन एस एस व्ही पी एस इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरातील पॉलिटेक्निकच्या सभागृहात रोज सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे. धुळे शहरातील कलावंत , लेखक, रसिक या महोत्सवात एकत्र येऊन या महोत्सवाच्या आयोजनात व नियोजनात मदत करत आहेत . धुळ्यामधील सांस्कृतिक क्षेत्रात या महोत्सवामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे .