जळगाव, (प्रतिनिधी) : राज्याच्या समाज कल्याण विभागात प्रथमच अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ,व प्रधान सचिव डॉ.हर्षदिप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या संकल्पनेतून अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांना दि. ४ रोजी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. दि. ४ व ५ या दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत नाशिक, जळगाव, धुळे ,मुरबाड व अहिल्यानगर या पाच जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. या स्पर्धांमध्ये सांघिक खेळांमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन, हॉलीबॉल, तर वैयक्तिक स्पर्धेमध्ये १०० मीटर, २०० मीटर धावणे, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, या खेळांचा समावेश आहे.
समाज कल्याण नाशिक विभागातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, सर्व विशेष अधिकारी यांच्यासह विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रादेशिक उपायुक्त कार्यालय नाशिक व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेश प्रियदर्शनी मुख्य प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया जळगाव, उपायुक्त राकेश पाटील, उपायुक्त राकेश महाजन, सहाय्यक आयुक्त जळगाव योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर,सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंटीवार, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे,संजय सैदाणे, राजेंद्र पाटोळे, जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील, यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.