जळगाव, (प्रतिनिधी) : येथील ट्रान्सपोर्ट नगर येथे हमाल, कामगार, ट्रक व अवजड चालक यांची वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. आ. राजूमामा भोळे यांनी शिबिरासाठी पुढाकार घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून या शिबिरात ११६ जणांची तपासणी करण्यात आली.
राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, उपमुख्यमंत्री कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव आणि आ. राजूमामा भोळे यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील ट्रान्सपोर्ट नगरात वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. शिबिराला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जनऔषधवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगिता बावस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. आ. राजूमामा भोळे यांनी शिबिरासाठी पुढाकार घेतला. शिबिरात, हमाल, कामगार, ट्रक व अवजड चालक यांना दैनंदिन जीवनशैली कशी असावी याविषयी नोडल अधिकारी डॉ. रितेश सोनवणे यांनी माहिती दिली. तसेच, समाजसेवा अधीक्षक चेतन पाटील यांनी शासनाच्या आरोग्याबाबत असलेल्या विविध योजनांबाबत माहिती दिली.
यानंतर आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजार असणाऱ्या व्यक्तींना शासकीय रुग्णालयात मोफत औषधी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. अश्विनी जेवरीकर, समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक चेतन पाटील, डॉ. अमेय नेहेते, डॉ. ऋतुजा भोजे, डॉ. राजश्री तायडे, डॉ. सागर सानप, हितेश पाटील, ज्ञानेश्वर राठोड यांनी तपासणी केली. ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून अशोक वाघ, नंदू पाटील, कल्पेश छेडा, महेंद्र अबोटी, कासम पटेल, जावेद शेख, उस्ताद मुस्ताक, कृष्णा पाटील यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. अशोक वाघ यांनी आभार व्यक्त केले.