जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे एका वनगुन्ह्यातील संशयित आरोपीला त्याच्या अल्पवयीन मुलाला भेटू न दिल्याने या मुलाने आत्महत्या केली होती. यामुळे वनविभागवर ग्रामस्थांचा रोष आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दाखल अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्यात पोलिसांनी रविवारी दि. ४ ऑगस्ट रोजी नातेवाईक व कुटुंबियांचे जाबजबाब नोंदविले. यावेळी मुलाने लिहून ठेवलेली “सुसाईड नोट” ताब्यात घेतली आहे. तर न्यायालयाच्या परवानगीनंतर मृत मुलाच्या वन कोठडीत असलेल्या मातापित्याला शनिवारी दि. ३ रोजी संध्याकाळी अंत्यविधीला उपस्थित राहता आले.
काही दिवसांपूर्वी रहीम रफिक पवार आणि तेवाबाई रहीम पवार यांच्यासह ६ जणांना सीमाशुल्क विभागाने वाघाची कातडी विक्रीसाठी आणल्याप्रकरणी अटक करून वन विभागाच्या ताब्यात दिले होते. तेव्हापासून सर्व ६ संशयित वन विभागाच्या कोठडीत आहेत. वन कोठडीत असलेल्या रहीम पवार यांना चौकशीकामी वन पोलिसांनी शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याच्या घरी हलखेडा येथे आणले होते. घरी आणल्यावर सुद्धा वडिलांना भेटू दिले नाही म्हणून रहीम पवार यांचा १४ वर्षीय मुलगा सोम रहीम पवार याने मनावर आघात झाल्याने तेव्हाच समोरच्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. .
दरम्यान, सोम पवार याच्या अंत्यविधीला त्याच्या कोठडीत असलेल्या मातापित्याला भेटता यावे म्हणून कुटुंबीय शनिवारी न्यायालयात गेले होते. तेथे न्यायालयाच्या परवानगीने वन कोठडीतून सोमचे वडील रहीम व आई तेवाबाई यांना हलखेडा येथे शनिवारी दि. ३ रोजी संध्याकाळी बंदोबस्तात जाता आले होते. यावेळी मातापित्याने मन हेलावणारा आक्रोश केला. यामुळे हलखेडा येथे भावपूर्ण वातावरण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेचा तपास निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रदीप शेवाळे यांनी सुरु केला. रविवारी त्यांनी हलखेडा गाठून सोमने लिहिलेली “सुसाईड नोट” ताब्यात घेतली. तसेच, हस्ताक्षराचा अभ्यास करायला त्यांनी दोन वह्या ताब्यात घेतल्या आहेत.