विशाखापट्टणम येथील घटना ; तीन बोगी जळून खाक
विशाखापट्टणम (वृत्तसंस्था ) दि. ०४ ऑगस्ट २०२४ | विशाखापट्टणम येथील रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनला रविवारी अचानक आग लागली. या आगीत ट्रेनच्या तीन बोगी जळून खाक झाल्या. हा अपघात कोरबा एक्सप्रेस (१८५१७) मध्ये झाला असून घटनेवेळी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उभी होती. या अपघातात तीन एसी डबे जळाले. सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, B7 बोगीच्या टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. यामुळे बी7 बोगी पूर्णपणे जळून खाकझाली. यानंतर ही आग B6 आणि M1 एसी बोगींमध्ये पसरली. आगीची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यास सुरुवात केली. त्यावेळी ट्रेनमध्ये एकही प्रवासी नव्हता ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही.
रेल्वेच्या बोगींना लागलेल्या आगीच्या घटनेचा जो व्हिडिओ समोर आला आहे तो धक्कादायक आहे. एसी डब्यांमधून उंच ज्वाळा उठत असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच आजूबाजूला धुराचे लोट पसरले आहेत. आग विझवण्यात रेल्वे कर्मचारी व्यस्त आहेत. त्याचवेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.