जामनेर | दि.०४ ऑगस्ट २०२४ | मद्य प्राशन करुन वाहन चालवणे चार मध्यपींना चांगलेच महागात पडले. दरम्यान मद्य प्राशन करुन वाहन चालवल्याप्रकरणी पहूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जामनेर न्यायालयाने ४ मद्यपींकडून २० हजारांचा दंड वसूल केला. कारवाईत सातत्य राहावे अशी नागरिकांची मागणी आहे.
पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लेले नगर चौकात सायंकाळी नाकाबंदी सुरू होती. तेव्हा भुसावळ येथील संजय आत्माराम वराळे, सांगवी पहूर येथील दिलावर अन्वर तडवी, पहूर कसबे येथील राहुल सुभाष थोरात व एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील मनोज गोकुळ सोनार हे मद्यपान, नशा करून वाहन चालवताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.
पहूर पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत चौघा मद्यपींना प्रत्येकी रुपये ५ हजार इतका दंड ठोठावला. पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस नाईक राहुल पाटील, पोलीस नाईक परेश महाजन, अमलदार वैभव देशमुख, चालक मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.