गजानन पाटील | अमळनेर, दि.07- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून मागील वर्षभरात तालुक्यातील जवळपास २,६६९ लाभार्थ्यांना योजनांमध्ये समाविष्ट करून प्रलंबित प्रकरणे मंजूर करून लाभ देण्यात आला आहे. आमदार अनिल भाईदास पाटील, संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा जयश्री पाटील तसेच समितीच्या सर्व सदस्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणे मंजूर करण्यात आलेली आहेत.
शासनाकडून गोरगरीब व वंचित घटकांना अनेक योजनांचा लाभ दिला जातो. यात प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीवेतन अनुदान जेष्ठ नागरिकांच्या खात्यांवर जमा होत असते. यात समितीच्या मागील ३ बैठकांमध्ये ३ हजाराच्या जवळपास प्रकरणांचा निपटारा केला गेला. काही प्रकरणांमध्ये कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे प्रलंबित असून त्यांना देखील पुढील काळात बैठक घेऊन मंजुरी देण्यात येणार आहे.
१० नोव्हेंबर २०२० च्या बैठकीमध्ये संजय गांधी योजनेच्या १३३ तर श्रावणबाळ योजनेच्या ८८४ अशी एकूण १०१७ प्रकरणे मंजूर करण्यात आली सोबतच ०२ फेब्रुवारी व २३ जुलै २०२१ च्या बैठकीत संजय गांधी योजनेचे ३९० तर श्रावणबाळ योजनेचे १२६२ प्रकरणे मंजूर केली.मागील वर्षभरात एकूण २६६९ लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. यासाठी समितीच्या अध्यक्षा जयश्री अनिल पाटील, सदस्य शीतल पाटील, संजय पाटील, एल.टी.पाटील, दीपक पाटील, विजय पाटील, देविदास देसले, सुभाष पाटील, हिरालाल भिल यांचे सहकार्य लाभले.
प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, समितीचे कोविडच्या काळातही उत्कृष्ट काम
मागील ५ वर्षांपासून संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ व इतर योजनांची प्रकरणे प्रलंबित होती.सर्वसामान्य गरीब लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने समितीच्या अध्यक्षा जयश्री पाटील व समितीच्या सदस्यांनी कोविडच्या काळात ही दिवस दिवसभर ठाण मांडून प्रलंबित प्रकरणांची छाननी करून वंचित व निराधार असलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळवण्यासाठी सहकार्य केले यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व तहसील कर्मचारी यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.