अमळनेर, दि.07 – तालुक्यात बोरी नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलायं. यातच सात्री गावातील आजारी असलेल्या एका 13 वर्षीय आदिवासी बालिकेला नदीला पूर आल्याने योग्य वेळी उपचार न मिळाल्याने तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. आरुषी सुरेश भिल असे मृत बालिकेचे नाव आहे.
नदीला पूर आल्याने गावातील काही जणांनी मोटर सायकलची ट्यूब व खाटीच्या साह्याने नदीचा पूर पार करून बालिकेला रुग्णालयात दाखल केले. मात्र बालिकेला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
दरम्यान सात्री गाव हे तापी प्रकल्पात 100% पुनर्वसित करण्यात आले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या गावाचे पुनर्वसन रखडल्याने या गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सात्री गावाचे सरपंच महेंद्र बोरसे यांनी केला. दरम्यान या प्रकरणी तातडीने चौकशी करण्यात येणार असल्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले.
प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे निष्पाप बालिकेचा जीव तर गेला. मात्र या संदर्भात शासनाने लक्ष घालून गावकर्यांचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा अशी मागणी होत आहे.
पहा.. VIDEO